परळी शहर पोलीस ठाण्याचा हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.आरती जाधव यांनी घेतला पुढाकार
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मेडिकल दुकानेही बंद ठेवण्यात आली असून घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मज्जाव केलेला आहे. अशा स्थितीत महिलांच्या मासिक पाळीतील आरोग्याला बाधा पोचण्याचा अनेक शक्यता निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक हेमंत कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सॅनिटरी पॅड वाटप मोहीम राबविण्यात आली.
मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील नाजूक अवस्था असते, या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण शहर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. रुग्णालय संलग्नित मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झालेले आहे. चूल आणि मूल अशी दशा असलेल्या महिला या बंद काळात जाणार कुठे? आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणार कशा? अशी स्थिती निर्माण झालेली आहे. स्त्रियांच्या आरोग्याचा महत्वपूर्ण प्रश्न लक्षात घेऊन परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांना घरोघरी जाऊन सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी महिला पोलीस हवालदार श्रीमती चक्रे व दोन होमगार्ड यांना सोबत घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबविला. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.हेमंत कदम यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment