आधीच मास्कमुळे 'नाकबंदी' त्यात पत्रकारांची 'मुस्कटदाबी


पत्रकारांनी स्वरक्षणासाठी दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

परळी वै. (प्रतिनिधी)-: येथील माध्यम प्रतिनिधींनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात 'गांधीगिरी' स्वरूपात आंदोलन करून निवेदन दिले. तोंडाला काळी पट्टी बांधून एकही शब्द न बोलता पत्रकारांनी आपले निवेदन प्रशासनाला दिले. मास्कमुळे आधीच 'नाकबंदी' आहे पण आता वाढत्या दादागिरीमुळे पत्रकारांची 'मुस्कटदाबी' होत असल्याचा संदेश पत्रकारांनी या आंदोलनातून दिला.

20 मार्च रोजी कोरोनाबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे व संभाजी मुंडे आदींना कोरोमंडल किंग सिमेंट कंपनीच्या गेटवर मारहाण करण्यात आली होती. तसेच संभाजी मुंडे यांच्या घरी देखील हल्ला केला गेला. त्या अनुषंगाने परळी वैजनाथ येथील संभाजी नगर व शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र याबाबत आजवर तपासात काहीही कारवाई झालेली नाही. त्याचा निषेध करत पत्रकारांनी आपली कैफियत महसूल प्रशासनाकडे मांडली. 

संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक झालेली होती. मात्र ते आरोपी जामिनावर सुटून आणखी त्रास देऊ लागले आहेत. दोन्हीही गुन्ह्यातील संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करण्यात यावे. आपल्या जीवावर उदार होऊन सामान्य नागरिक व प्रशासनास मदत करणाऱ्या लोकशाहीच्या चौथा स्तंभावरील या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व तीव्र निषेध व्यक्त केला होता. अन्यथा, प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांत आपण लॉकडाऊन म्हणून सर्व पत्रकारांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. पण, त्याचा गैरअर्थ काढण्यात प्रशासनाने कसलीच कसर ठेवलेली नाही अशी पत्रकारांची भावना झाली आहे. जर संबंधित सर्व प्रकरणातील आरोपी निवेदन दिल्यानंतर लवकरात लवकर अटकेत नसतील तर तहसील समोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, माहिती व जनसंपर्क विभाग, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, औरंगाबाद जिल्हाधिकारी, बीड पोलीस अधीक्षक, बीड यांना पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संभाजी मुंडे, अनंत गित्ते, धीरज जंगले, बालकिशन सोनी, ओमप्रकाश बुरांडे, प्रकाश सुर्यकर, प्रशांत जोशी, मोहन व्हावळे, संजय खाकरे, धनंजय आरबुने, धनंजय आढाव, दिलीप बद्दर, ज्ञानोबा सुरवसे, प्रा.रवींद्र जोशी, दिलीपभाऊ जोशी, प्रकाश चव्हाण, बालासाहेब फड, दत्तात्रय काळे, प्रविण फुटके, महादेव शिंदे, किरण धोंड, अनिरुद्ध जोशी, अनंत कुलकर्णी, स्वानंद पाटील, संतोष जुजगर, गौतम साळवे, कैलास डुमणे, माणिक कोकाटे, शेख बाबा, प्रकाश वर्मा, गणेश अदोडे, काशिनाथ घुगे, महादेव गित्ते, शेख मुकर्रम, सुकेशनी नाईकवाडे, बालाजी ढगे, समीर इनामदार आदींसह सर्व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पालकमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार
पत्रकारांवर वारंवार होत असलेले हल्ल्यांबाबत परळी पत्रकार संघाचे शिष्टमंडळ पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना भेटणार आहे. लवकरच भेट घेऊन त्यांच्याकडे प्रश्नांची कैफियत मांडणार असल्याचे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

आंदोलनाचे वैशिष्ट्य

सर्व पत्रकारांनी सोशल डिस्टन्स पाळत, तोंडाला मास्क बांधून त्यावर पोलीस प्रशासनाचा निषेध करत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.

पीडित पत्रकारांनी दिलेले निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांच्यावतीने नायब तहसीलदार बाबुराव रुपनर जे स्वतःच पीडित आहेत त्यांना दिले. कर्तव्यावर असताना 28 मे रोजी रूपनर यांच्यावर हल्ला झाला होता ज्याबाबत आधीच गुन्हा दाखल झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला