सामान्यांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?, सोमय्यांचा सरकारला सवाल
मुंबई (प्रतिनिधी)-: सर्वसामान्य नागरिकांची एकच कोरोना चाचणी करण्यात येते. तसा ठाकरे सरकारने आदेश काढला आहे. मग अशा परिस्थितीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन कोरोना चाचण्या का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारला विचारला आहे.
सर्वसामान्य नागरिकांची एक टेस्ट मग मंत्र्याच्या दोन टेस्ट का? हा दुजाभाव कशासाठी करायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कमीत कमी चाचण्या करण्याचं शासनाचे धोरण आहे. मात्र धनंजय मुंडे यांना मात्र वेगळी वागणूक देत पुन्हा त्यांची टेस्ट करण्यात आली, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडेसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात करत कोरोनाविरूद्धचं युद्ध जिंकलं आहे. आज त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याबरोबर त्यांनी विजयी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी उपचार करणारे डॉक्टर, नर्स तसंच त्यांना आशीर्वाद देणारे त्यांचे हितचिंतक यांचे आभार मानले आहेत.
सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो. आज डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी काळजी घेतली. सगळ्यांचे मनापासून आभार हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपण कोरोनारुपी संकटावर नक्की मात करू, अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.
दरम्यान, सर्वांत आधी मंत्री जितेंद्र आव्हाड त्यापाठोपाठ मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता या तिन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
Comments
Post a Comment