कायम विनाअनुदानित 'वरिष्ठ' महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे घरबैठे बेमुदत धरणे आंदोलन
परळी (प्रतिनिधी) -: राज्यातील कायम विनाअनुदानित (कला, विज्ञान व वाणिज्य)वरिष्ठ महाविद्यालयाचे दिनांक 19/06/ 2020 पासून धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जात आहे,असे कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण तिडके व जिल्हा सचिव प्रा.पोपटराव बेळगे यांनी सांगितले आहे.प्राचार्य ज्ञानेश्वर बडे,प्रा.सौ.सुरेखा शिंदे,प्रा.शेरखान पठाण, कुमारप्पा होनराव प्रा.डॉ.श्याम निर्मळ यांच्यासह अनेक प्राध्यापक व कर्मचारी घरबैठे धरणे आंदोलनात कुटुंबासह सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने सन 2001 पासून राज्याच्या पवित्र शिक्षणव्यवस्थेत 'कायम विनाअनुदान' हे जाचक व अन्यायकारक धोरण राबवून शिक्षणव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांप्रमाणे आम्हालाही अनुदान मिळेल. या अपेक्षेपोटी राज्यातील नेट-सेट पी. एचडी. धारक प्राध्यापक व कर्मचारी वर्ग हा गेली वीस वर्षांपासून विनावेतन अध्यापन करीत आहे.महाराष्ट्र शासनाचे 50 टक्के अनुदान मिळाले तर 50 टक्के अनुदान युजीसी देणार आहे.त्यामुळे राज्याने वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे फारसे अवघड नाही.राज्याच्या मंत्रिमंडळात आमचे सहा शिक्षक प्रतिनिधी असून देखील आमच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही.अशी खंतही त्यांनी व्यक्त केलेली आहे.आज या जागतिक महामारीमुळे तर या वर्गावर खूप मोठे संकट ओढवले आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नसल्यामुळे घरी बसून शासनाच्या नियमांचे पालन करीत संघटना 19 जून पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करत आहे. जोपर्यंत आमचा 'कायम'शब्द काढून प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने का असेना परंतु अनुदान घोषित करून त्याचा शासनादेश निघणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अशी माहिती राज्य अध्यक्ष प्रा.संजय जाधव यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment