कृषी कर्जातील अडथळे दूर करा –प्रा.अतुल दुबे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत बँक अधिकाऱ्यांसोबत चर्चा
परळी (प्रतिनिधी) -: जुन महिन्याच्या अगदी सुरूवातीलाच पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे दिवस अत्यंत महत्वाचे आणि खर्चाचे दिवस आहेत. अनेक संकटांना तोंड देणारा बळीराजा अगोदरच आर्थिक अडचणीत सापडला असून, नविन पिककर्ज मिळण्यासाठी त्याला बँकेत हेलपाटे घालावे लागत आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारी ही समस्या लक्षात घेवून आज शिवसेना, विद्यार्थी सेनेच्या वतीने बीड जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
तालुक्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज मिळण्यात येणारे अडथळे दूर करावेत या मागणीसाठी विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी शेतकऱ्यांसोबत आणि आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज्य सरकारने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जप्रक्रीया सुलभ व्हावी यासाठी स्पष्ट निर्देश दिलेले असतांनाही काही बँका शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. ऐण पेरणीच्या काळात शेतातील कामे सोडून बँकेत शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. बँकेतील कर्मचारी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता त्यांना अनेक जटील कागदपत्रांची पूर्तता करायला सांगत आहेत. यामुळे अगोदरच संकटात सापडलेले शेतकरी अधिक संकटात आले आहेत. पेरणीचा काळ संपूण गेल्यावर बँका कर्ज देणार का? असा सवाल प्रा.अतुल दुबे यांनी करत आगामी काळात शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांच्या दारात शिवसेना स्टाईला आंदोलन करू असा ईशारा दिला आहे.
Comments
Post a Comment