कोरोनामुळे मयत झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यास 50 लाखांचा वीमा तत्काळ मंजूर करावा - राहुल पोटभरे
परळी (प्रतिनिधी) :- सिरसाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेख जब्बार फरीद यांच्या कोरोनाने झालेल्या निधनामुळे शिक्षक व संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ड्युटी देण्यात आलेली आहे.शेख जब्बार सर हेसुद्धा परळी येथील सचिन किराणा (मोंढा मार्केट) या ठिकाणच्या खाजगी दुकानावर 'डिलिव्हरी बॉय, म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होते. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडताना या कोरोना योद्ध्याचा अंत झाला आहे. शासन निर्णयाप्रमाणे शेख जब्बार सर यांना प्रशासनाच्या वतीने तात्काळ 50 लाख रुपये मंजूर करण्यात यावे अशी मागणी म.जि.प.मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्षराहुल पोटभरे यांनी केली आहे.जेणेकरून त्यांच्या कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
खाजगी किराणा दुकानावर आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.या कामात असलेल्या शिक्षकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षा पुरवीण्याची मागणी यापुर्वीच अनेक शिक्षक संघटनांनी केली होती.परंतु प्रशासनाच्या वतीने या मागणीला कसलाही प्रतीसाद देण्यात आला नाही. त्यामुळे यापुढे सुद्धा अनेक शिक्षकांना याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेख जब्बार यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी 50 लाखाचा विमा तात्काळ मंजूर व्हावा अशी मागणी म.जि.प.मागासवर्गीय शिक्षक संघटनेने प्रशासनाला केली आहे.सदरील मागण्याचे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री बीड,मा.जिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी अधिकारी बीड,शिक्षणाधिकारी(प्रा.) बीड,मा.तहसीलदार परळी,गटविकास अधिकारी परळी,व गटशिक्षणाधिकारी परळी यांना देण्यात आले आहे.संबंधित निवेदनावर असंख्य शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment