सामाजिक न्याय खात्याला धनंजय मुंडेंच्या रूपाने मिळाला वंचितांचा आधार!


समाजातील वंचित उपेक्षित, दीन - दुबळ्या घटकांसाठी इतकंच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेल्या संवैधानिक अधिकारांच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन स्वतःला प्रगतीपथावर घेऊन निघालेल्या विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नेमलेल्या सामाजिक न्याय अर्थात समाज कल्याण खात्याला राज्याच्या आर्थिक कारभारात दरवर्षी साधारणतः १० हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल असताना सुद्धा दुय्यम समजले जाते. या खात्याच्या लाभार्थ्यांची आकडेवारी तपासली असता राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३५% इतके आहेत, मग हे खाते दुय्यम कसे असू शकते? 

सामाजिक न्याय विभागाला समाजमनात दुय्यम स्थान मिळवुन देण्यासाठी त्या - त्या वेळची राजकीय इच्छाशक्ती कदाचित जबाबदार असावी, किंबहुना प्रबळ विकासाभिमुख इच्छाशक्ती असलेलं नेतृत्व या विभागाला आजवर प्राप्त न झाल्यामुळे उल्लेखनीय कामगिरी दिसून येत नसावी! 

मागील अनेक वर्षाचा इतिहास काढून बघितला तर सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्वतःच्या लेकरांना विभागाची लाखो रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी योजनाच बदलून टाकली अशी काही उदाहरणे पाहायला मिळतात. 

२०२० च्या उंबरठ्यावर राज्यात अनपेक्षित सत्तांतर घडून महाविकास आघाडीचे सरकार आले. दिल्लीतल्या चाणक्याला शह देऊन खा. शरदचंद्र पवार साहेबांनी सेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी घडवून राज्यात सर्वात जास्त संख्या असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी पवार साहेबांनी मागील भाजपच्या सत्ताकाळात सर्वात प्रभावी युवा नेतृत्व तसेच संबंध महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून राळ उठवणारे नेतृत्व शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहुजन समाजातील प्रश्नांची उखल असणारा नेता म्हणून प्रभावशाली कृतत्व ठरलेल्या धनंजय मुंडे यांना देण्याचे ठरवले.

पवार साहेब यांच्या मनाचा अंत भल्याभल्यांना कळणार नाही, धनंजय मुंडे यांच्या सारख्या कणखर तरुणाला हे खाते देण्यामागे खात्याचे बळकटीकरण जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि तीन पक्षांच्या सरकारमध्ये प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळावा हा प्रमुख उद्देश असावा असे जाणकार सांगतात.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आशा नेतृत्वाची गरज आहे. ही विचारधारा रुजविण्यासाठी अनेक सामाजिक अभियांत्रिकी परळी मतदारसंघात राबविण्यात आल्या. आज त्याची प्रचिती म्हणून धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण होत नाही.

सामाजिक न्याय खात्याचा पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे यांनी अगोदर खात्यातील सर्व बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध योजना, राज्यभर विस्तार असलेले विविध शाळा - वसतिगृह यांचे जाळे, प्रशासन स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात असलेला विस्तार हे सगळे असूनही प्रभावी अंमलबजावणी चा अभाव असावा ही उणीव मुंडे साहेबांच्या नजरेतून चुकली नाही.

त्यातच नव्याने आलेल्या सरकारच्या पहिल्या नियोजनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आले आणि धनंजय मुंडे यांनी विभागाला ११ हजार कोटींपेक्षा जास्त निधी प्राप्त करून घेतला. खात्याला आणि खात्यातील लाभार्थींना आता चांगले दिवस येणार याची सर्वांनाच जाणीव झाली. 

कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत आता सगळ्याच योजनांना, विकासकामांना कात्री लागणार की काय असा प्रश्न भेडसावत असताना धनंजय मुंडे यांनी मात्र १३०० कोटी रुपये निराधार आदींना मानधन देण्यासाठी खात्यात वर्ग करून घेण्यात यश मिळवले, राज्यातील लाखो दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ नागरिक, विधवा आदींना त्यांच्यामुळे दिलासा मिळाला.

गेल्या दोन अधिक वर्षांपासून थकलेल्या शिष्यवृत्ती साठी ४६० कोटी रुपये मंजूर करून मुंडे साहेबांनी विद्यार्थ्यांनाही न्याय देण्याचे काम केले.

बीडीडी चाळीतील वसतिगृह तपासायला, तिथल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्यायला जेव्हा मुंडे साहेब तिथे गेले, तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांना ते म्हणाले, 'कसलीही अडचण आली तर मला फक्त एक sms करा', त्यांच्या परळी मतदारसंघात काम करण्याची पद्धत आपण जाणून आहोत, त्याच पद्धतीने सामाजिक न्याय दान मुंडे साहेब करणार असतील तर ही नक्कीच आनंदाची बाब आहे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी च्या माध्यमातून दरवर्षी १०५ विद्यार्थ्यांना पीएचडी किंवा एमफिल पूर्ण करण्यासाठी फेलोशिप दिली जाते, यावर्षी फेलोशिप साठी ४०८ पात्र अर्ज आले होते, कोट्यावधी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार हे माहीत असूनसुद्धा कसलाही विचार न करता मुंडे साहेबांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणाचेही केवळ पैश्या अभावी शिक्षण बंद पडू नये या भावनेने सर्व ४०८ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला.

कोरोना काळात प्रत्येक जिल्ह्यात, शहरात समाज कल्याण विभागामार्फत प्रभावी यंत्रणा राबवत मुंडे साहेबांनी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना आधार मिळावा यासाठी स्थापन केलेल्या मदर कक्षाच्या माध्यमातून लाखो लोकांना दिलासा मिळाला, बीड जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे क्लास वन दर्जाचे अधिकारी वयोवृद्ध बेवारस माणसांची कटिंग - दाढी करताना वर्तमानपत्रात वाचायला मिळाले; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भाषेत वंचित - उपेक्षित समाजाचा वाली आणि वाणी होणे यालाच तर म्हणतात!

कोरोना आमच्या मुळावर आल्यामुळे विकासकामांच्या निधीला जरी थोड्याफार प्रमाणात ब्रेक लागला तरी धनंजय मुंडे यांच्या सारखे मुरलेले नेतृत्व काय करू शकते याचे प्रात्यक्षिक त्यांनी कडक लॉकडाऊनच्या काळात दाखवुन दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ते सर्वच समाज घटकांच्या सम्यक व सर्वांगीण विकासासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिलेल्या नागरी हक्कांसाठी ते यशस्वी व सकारात्मक प्रयत्न करतील अशी आशा नाही तर खात्री आहे. 

आज आयु. धनंजय मुंडे यांचा जन्मदिन असल्याने त्यांना शुभेच्छांसह आमच्या सामाजिक न्याय विभागाला वैभव प्राप्त करून तळागाळातल्या आमच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्यायाचा लाभ पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.

@ अनंत इंगळे, (परळी वै.)

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला