चिमुकल्यासह आईचा भर रस्त्यावर आक्रोश! पोलीस व पत्रकारांच्या मदतीने आई व बाळ सुखरूप पोचले घरी
परळी वै.(प्रतिनिधी) -: कोरोना रुग्णांचा परळी शहरात आकडा झपाट्याने वाढतोय. याला प्रतिबंध करण्यासाठी पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊन जिल्हाधिकारी बीड यांनी घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही कडकडीत बंद राहील याची दक्षता प्रशासन चोख घेतंय, या सर्वातही प्रशासकीय यंत्रणेत कुठेतरी अभाव असल्याचे चित्र आज पहायला मिळाले. दादाहरी वडगाव येथील एक बाळंत महिला या गोष्टीच्या त्रासाला बळी पडली. नव्या जन्मलेल्या बाळासह या मातेचा आक्रोश परळीच्या रस्त्यावर सुरू होता. दवाखान्यातून सुट्टी मिळाल्याने गावाकडे जायला ना आंबूलन्स मिळत होती ना खाजगी वाहन. अखेर शेवटी पत्रकारांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ वाहनाची व्यवस्था करून त्यांना सुखरूप पाठवण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादाहरी वडगाव येथील सौ.सीमा सतीश सरवदे या दि.05 ऑगस्ट रोजी बाळंतपणासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तेथे त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. आज दि.12 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली होती. अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद होते. ना वाहन मिळत होते, ना कोणी मदतीला होते. आपल्या चिमुकल्यासह आता गावाकडे कसे जाणार? हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. काहीही व्यवस्था नसल्याने गावाकडील एक वाहन त्यांनी बोलावून घेतले, मात्र संचारबंदी असल्याने त्याही वाहनाला पोलिसांनी बाहेरच अडवले. यामुळे आतातर त्यांच्या भीतीला अंत राहिला नव्हता. रडत आक्रोश करत घाबरून गेलेल्या माय-लेकी शेवटी पायीच निघाल्या होत्या. कोरोना परिस्थितीची माहिती आणि उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पत्रकारांना उपजिल्हा रुग्णालयात निमंत्रित करण्यात आले होते. तेथे जात असलेल्या पत्रकारांना या बाळंत महिलेचा बाळासह आक्रोश दिसला आणि रहावले नाही. तात्काळ त्यांना धीर देत पोलिसांना विनंती करून गावाकडील वाहन बोलावून घेतले आणि त्यांना सुखरूप पाठवून देण्यात आले. पत्रकारांच्या मदतीला संभाजी नगरचे पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, पो.उप.नि. संतोष मरळ, सहा.फौजदर चंद्रय्या आईटवर, शत्रुघ्न शिंदे यांचे सहकार्य मिळाले. यावेळी पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे, प्रशांत प्र. जोशी, धनंजय आरबुने, मोहन व्हावळे, धनंजय आढाव, संभाजी मुंडे, दत्तामामा लांडे यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment