एक लढवय्या पँथर : दिलीप (बापू) माधवराव जावळे


 साधारणतः सण 1982 - 83 चा काळ होता माजलगावच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक रामराव हाके यांच्या विखारी वर्तणुकीमुळे "हाके तुझे फोडतो डोके" असे संतापजनक घोषणा देत तेथीलच पाण्याचे मडके उचलून हाके यांच्या डोक्यावर फोडले .अशी आपल्या चळवळीशी व सहकार्‍यांशी असलेली निष्ठा व प्रामाणिकपणा दाखवणारे डॅशिंग दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे कालवश पँथर दिलीप (बापू) जावळे यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन.
आपल्याला जे आज स्वाभिमानी जिवन मिळाले , कर्मचार्‍यांची नोकरीतील सुरक्षितता,  आर्थिक स्थिरता दिसून येते त्यासाठी आंबेडकरी चळवळीत आपली हयात घालवली अशा कार्यकर्त्यांचा त्याग व चळवळींत योगदान  हा त्यामागचा भक्कम पाया म्हणता येईल.
 बीड जिल्ह्यातील तालुका माजलगाव येथे  दिलीप बापू जावळे  यांचा जन्म 18 जानेवारी 1960 मध्ये डॉ आंबेडकर नगर येथील पारूबाई व माधवराव जावळे यांच्या पोटी झाला त्यांना एकूण पाच भाऊ  व एक बहीण  असा मोठा परिवार होता .
त्यांचे आई-वडील शासकीय नोकरीत  चतुर्थ श्रेणी मध्ये  नोकरीस होते त्यांचे शालेय शिक्षण माजलगाव येथेच पूर्ण झाले
डॉबाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी जहाल युवक चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांच्या प्रश्नावर सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे *दलित पॅंथर* होय.
अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्त्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव दलित पॅंथर वर होता.
इसवी सन 1970 च्या आसपास मागासवर्गीय जाती वरील अत्याचारांनी कळस गाठला होता या सगळ्यांचा परिणाम म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली. "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्त्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढा "हे सूचित करणारं नामाभिधान त्यांनी स्वीकारली.
रिपब्लिकन पक्षातील गटबाजी नेत्यांची निष्क्रियता व त्यातून उद्भवलेल्या समाजाचा मरगळलेले पणा त्यावर लढा देण्यासाठी दिनांक 09 जुलै 1972 रोजी मुंबईला दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना केली गेली.
पुढे या संघटनेला अरुण कांबळे ,रामदास आठवले ,दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे ,प्रीतमकुमार शेगावकर यांचे नेतृत्व लाभले. 7 मार्च 1977 रोजी राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पॅंथर बरखास्तीचा निर्णय घेतला त्यामुळे या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, रामदास आठवले ज .वि. पवार ,दयानंद म्हस्के इत्यादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दिनांक 28 एप्रिल 1977 ला औरंगाबाद येथे *भारतीय दलित पॅंथर* ची निर्मिती केली आणि आपले कार्य चालू ठेवले.
या नेत्यांनी आक्रमक शब्द प्रवृत्तीच्या जोरावर व भावनिक वक्तृत्वाच्या बळावर युवकांना आकर्षित केले सर्वसाधारणपणे याच 82- 83 च्या काळात दिलीप बापू जावळे या उमद्या ,रांगड्या ,नवतरुणावर प्रभाव पडला. अन्याय अत्याचाराची चीड मनात असंतोष निर्माण करत होती या असंतोषाला दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी वाट करून दिली आणि हा धगधगता निखारा पॅंथर म्हणून प्रसिद्ध झाला.
बीड जिल्ह्यातील माजलगाव हे चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते .तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रामुख्याने पॅंथर संघटनेचे मधुकर शिंदे ,दयानंद स्वामी ,तात्याराम खळगे ,एसएम डोंगरे आदी मंडळी कार्यरत होती. या काळामध्ये रामदास आठवले यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव दिलीप बापू यांच्यावर पडला तेव्हापासून पॅंथर ते रिपाई असा त्यांचा प्रवास घडला.
216 गावे असणारा माजलगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितले तर सचिव म्हणून किशोर प्रधान हे काम पाहत होते.
दिलीप (बापू) जावळे या पदावर कार्यरत असताना ते आक्रमक भूमिका घेणारे नेते होते .याचा प्रत्यय कार्यकर्त्यांना वेळोवेळी आला आहे .त्यापैकी काही प्रसंग सांगता येतील जसे की, माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील गायरान प्रकरणात मारामाऱ्या झाल्या होत्या व पोलीस केसेस झाल्यावर पॅंथरच्या टीम बरोबर दिलीप बापू उपजिल्हाधिकारी बनसोड यांना याप्रकरणी भेटण्यासाठी अंबाजोगाई कार्यालयात गेले होते .तेथे गायरान अतिक्रमण धारकांची बाजू मांडत असताना बापूंना मवाळ व नियमांची भूमिका पटली नाही तेव्हा त्यांनी सरळसोटपणे उपजिल्हाधिकारी यांना एकेरी भाषेत बोलत "तुझ्याकडून कारवाई करण्यात येणार आहे की नाही,  हे स्पष्ट सांग नसता आम्हाला जातीवर यावे लागेल". असा सज्जड दम त्यांनी दिला. बापूंच्या या बोलण्याचा रोख बनसोड साहेब यांना कळला असावा म्हणून कि काय, त्यांनी त्या प्रकरणात तातडीने पुढील कारवाई केली.
तसेच दिलीप बापू हे आपल्या नेतृत्वास, सहकार्‍यांना व कार्यकर्त्यांना फार जपत असत. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर त्या काळात माजलगाव पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक रामराव हाके हे कार्यरत होते. पँथर नेते दयानंद स्वामी यांच्या वर आकस बुद्धीने पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करीत आहेत असा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला होता व त्यांना ताब्यात घेतले होते ही माहिती समजताच  दिलीप (बापू )यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले व या सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा संताप व्यक्त करीत "हाके तुझे फोडतो डोके" अशी घोषणा देत उपनिरीक्षक हाके यांच्या डोक्यावर तेथीलच पाण्याचे मडके घेतले व फोडले अशा आक्रमक शैलीमध्ये बापूंनी चळवळीविषयी असणारे प्रेम व सहकारया विषयी असणारी निष्ठा दाखवून दिलेली आहे .
इसवी सन 1990 च्या काळात तात्कालीन आमदार राधाकृष्ण होके पाटील व दिलीप बापू यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते याचा फायदा ग्रामीण भागात आमदार फंडातून समाज मंदिरे तसेच दलित वस्ती मध्ये विविध प्रकारचे विकास कामे बापूंच्या म्हणण्यानुसार झाली.
या काळामध्ये दलित पॅंथर व काँग्रेस पक्षा ची युती झाली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गंगामसला जिल्हा परिषद गटातून बाबुरावजी पोटभरे यांना उमेदवारी मिळाली होती. या विजयामध्ये दिलीप बापू यांनी केलेली पराकाष्टा व आमदार राधाकृष्ण पाटील यांच्याशी असलेले बापूंचे जिव्हाळ्याचे संबंध या संयुक्त मिलाफा ने विजय सुकर झाला. बाबुराव पोटभरे सभापती झाले. यामुळेच बाबुराव पोटभरे यांनीसुद्धा दिलीप बापू यांना पॅंथर चे तालुकाध्यक्ष म्हणून निवडले. माजलगाव तालुका फार मोठा होता तसाच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जातीय तणाव सुद्धा होता .तेव्हा या गावामध्ये जाऊन गावकरयांशी चर्चा करून, समाजबांधवांना धीर देणे व त्यांना  त्यांचा स्वाभिमान मिळवून देणे ,पाठीशी खंबीरपणे उभे राहणे .हे सातत्य बापूंनी राखले .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करते वेळी काही गावांमध्ये त्या काळात जातीय तणाव निर्माण केला जात असे तेंव्हा सामाजिक सलोखा राखण्यासाठी बापु पुढाकार घेत असत. 
असे विविध कार्य त्यांनी केले यामध्ये प्रामुख्याने हिंगणी (खुर्द ),सादोळा ,आमला इत्यादी संवेदनशील गावांची उदाहरणे देता येतील.
चळवळीत काम करीत असतानाच्या  दरम्यान त्यांना शासकीय नोकरीची संधी मिळाली होती  परंतु त्यांचे मन नोकरीत रमले नाही.  मोठे बंधू अग्नीधर जावळे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस असल्यामुळे   सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार म्हणून दिलीप बापू यांनी आपले करियर घडवावे या करीता त्यांचा आग्रह होता. तेंव्हा दिलीप बापूंनी काहि दिवस कंत्राटदार म्हणून कामे हि केली  
 परंतु स्वाभिमानी स्वभाव व आक्रमक भूमिका या कारणामुळे ते जास्त काळ या क्षेत्रात रममाण झाले नाहीत.
त्यांचा संबंध संघटन व संपर्क याचा प्रभाव संघटनेत होता त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्याची संधीही मिळाली होती परंतु निवडणुकीत आकडेवारीच्या गणितात ते यशस्वी झाले नाहीत .ज्या सहकारयांसाठी वेळोवेळी ते धावून गेले. ते सहकारी मात्र निवडणुकीच्या काळात बापुकडे मदतीसाठी धावून आले नाहीत .
 हे  सत्य आहे. व खंत हि आहे. 
निवडणुकीत जरी ते यशस्वी झालेले नसले तरीही "पॅंथर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता व मैत्रीतील राजा माणूस " म्हणून सदैव कार्यकर्त्यांच्या मनात राहतील .
अशा धडाकेबाज ,अजातशत्रु ,पॅंथर दिलीप बापू जावळे यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी  कार्यकर्त्यांच्या,नातेवाईकां, मित्रमंडळींच्या व कुटूंबातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून अनपेक्षितपणे या जगाचा निरोप घेतला. 
कालकथित पँथर *दिलीप (बापू ) जावळे अमर रहे*

प्रा.शशिकांत जावळे बीड

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला